Shahrukh Khan Pune Metro: अभिनेता शाहरुख खान याचा आगामी सिनेमा 'जवान'चा टीझर प्रदर्शित झाला. त्या टीझरमध्ये पुणे मेट्रोची झलक बघायला मिळाली. शाहरुख तुकाराम नगर या मेट्रो स्थानकावर बसलेला दिसत आहे. पुणे मेट्रोने हा व्हिडिओ शेअर करताना एक पोस्ट लिहिली आहे. त्यात लिहिलं आहे की, शाहरुख खानच्या आगामी सिनेमासाठी पुणे मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाचीची झलक...' त्यामुळे आता पुणे मेट्रोचा मान वाढला आहे.


शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र लॉकडाऊननंतरच्या सिनेमाची सगळेच प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यात जवान सिनेमात शाहरुख खानचा वेगळा लूक बघायला मिळणार असल्याचं टीझरमधून स्पष्ट होत आहे. नेहमीच्या चौकटीच्या बाहेरची भूमिका या सिनेमात साकारणार असल्याचं समजतंय. शाहरुखच्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक चाहते त्याच्या जवान सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.


टीझरमध्ये नक्की काय आहे?
पुणे मेट्रोच्या अकाऊंटवरुन शाहरुख खानच्या जवान सिनेमाचं टीझर शेअर करण्यात आलं आहे. त्यात पुण्यातील (पिंपरी-चिंचवड) संत तुकाराम नगरच्या मेट्रो स्थानकावर वेगळ्या लूकमध्ये बसून दिसतो आहे. या व्हिडीओला पुणेकरांकडून भन्नाट प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. भारताची शान शाहरुख खान, पुण्यातील सीन बघून आनंद होत आहे, अशा अनेक प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहेत.


पुणे मेट्रोतील करामती व्हायरल
पुणे मेट्रोमध्या करामतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.  मेट्रो सुरु झाल्यावर त्यात भजन, नाच, गाणी, पुणेरी भांडणं याचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. तीन दिवसात किमान सात लाख पुणेकरांनी या मेट्रोचा प्रवास केला होता. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता. गरवारे ते वनाज हा मार्ग सध्या सुरु करण्यात आला आहे. मेट्रोच्या बाकी टप्प्यांचं काम अजून बाकी आहे. काही परिसरातून मेट्रोचा प्रवास भूयारातून होणार आहे. या सगळ्या भूयाराचं काम पूर्ण झालं आहे. स्वारगेट आणि बुधवार पेठेतील मेट्रोचा भूयारी मार्ग असणार आहे. दोन दिवसांपुर्वीत स्वारगेटस्थानकाजवळ ब्रेक थ्रु झाला. मेट्रोच्या भूयाराचा हा शेवटचा ब्रेक-थ्रु होता.