पुण्यातील कोथरुडमधील पाळणाघरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरुड पोलिसांनी तिघांच्या विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाळणाघरचालक महिलेसह दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
तक्ररदार महिला नोकरी करतात. त्यामुळे त्या त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला कोथरुडमधील एका घरगुती पाळणाघरात ठेवत असत. पाळणाघरचालक महिलेचा 17 वर्षांचा मुलगा आणि त्याचा 18 वर्षांचा मित्र हे पीडित मुलीवर अत्याचार करत होते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरु होता.
या पाळणाघरांमध्ये आणखी 20 लहान मुलं होती. त्यांच्या सगळ्यांच्या पालकांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. जर असा काही प्रकार घडला असेल तर तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले.