पुणे : सैबेरियातुन पहिल्यांदाच महाराष्ट्रात विसावलेल्या अमुर फाल्कन पक्षाच्या फोटोग्राफीस मनाई करण्यात आली आहे. वनविभागाच्या या आदेशाचे उल्लंघन झाल्यास फोटोग्राफर्सना कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. अमुर फाल्कनच्या अधिवासास बाधा पोहचू नये म्हणून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


सध्या लोणावळा या पर्यटनस्थळी हा दुर्मिळ पक्षी आढळतोय. मुळतः सैबेरियाच्या अमुर नदी लगत त्यांचं वास्तव्य असतं. याच नदीमुळं अमुर फाल्कन असं नाव पडलं. भारतात लाल टांग बाज तर महाराष्ट्रात अमुर ससाणा, अमुर बाज अथवा लाल पायांचा बाज या नावाने ओळखला जातो. नर जातीचा हा पक्षी आकाराने कबूतरापेक्षा लहान, अंगाचा वर्ण राखी-करडा, डोक्याचा मागचा भाग आणि पाय नारंगी-तांबडा, डोळ्याभोवती कातडी, शेपटी आणि मांडी गंजासारखी तांबडी रंगाची असते. तर मादी जातीचा हा पक्षी शेपटीसह वरील अंगाचा वर्ण राखी त्यावर काळ्या रेषा, माथा गर्द राखी, छातीवर काळे-उभे ठिपके, छातीवर आणि कुशीवर लांब उभे पट्टे असतात. बांगलादेश, सिक्कीम, भूतान, नेपाळ, मालदीव बेटे भूप्रदेशात अमुर फाल्कन नेहमी आढळतो तर श्रीलंकेत क्वचितच आढळतो. भारतातील हिमालयीन प्रदेशात त्याचा वावर दिसून येतो.


फाल्कनचे फोटो काढण्यास बंदी
असा हा दुर्मिळ अमुर फाल्कन महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाखल झालाय तो ही पर्यटकांचं आकर्षण केंद्र असणाऱ्या, सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या लोणावळ्यात. तसं लोणावळ्यासह मावळ तालुक्यात याआधी अनेक परदेशी पक्षाचं आगमन झालंय. पण अमुर फाल्कन पहिल्यांदाच विसावलाय. त्यामुळे अनेक फोटोग्राफर्सच्या लेन्स त्याला टिपताना दिसतायेत तर काहींच्या लेन्स आतुर झाल्यात. मात्र, फोटोग्राफर्सचा हा उतावळेपणा अमुर फाल्कनच्या अधिवासास बाधा पोहचवणारा ठरू शकतोय. असं झाल्यास पहिल्यांदाच विसावलेला अमुर फाल्कन भविष्यात इथे फिरकायचा नाही. ही शक्यता गृहीत धरून अमुर फाल्कनचे फोटो काढण्यास बंदी घालण्यात आलीये. तशा आदेशाचे फलक वनविभागाने लोणावळ्यातील पर्यटनस्थळी झळकवले आहेत. त्यानंतर ही फोटोग्राफर्स इथे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.