पुणे : गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तुम्हाला पेट्रोलपंपावर जावं लागतं. तेथे गेल्यानंतर पेट्रोल भरणारा कर्मचारी असेल तर ठिक अन्यथा कर्मचारी येईपर्यंत वाट पहाणे क्रमप्राप्त... पण या सर्वांवरही आता उपाय सापडला असून पुण्यात एक आत्मनिर्भर पेट्रोलपंप सुरु करण्यात आला आहे. या पेट्रोलपंपावर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमच्या हाताने पेट्रोल भरू शकता. कोणत्याही कर्मचाऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही. मागील दोन दिवसांपासून हा आत्मनिर्भर पेट्रोलपंप सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील आरटीओ चौकात हा पेट्रोलपंप असून दोन दिवसात अनेक पुणेकरांनी या आत्मनिर्भर पेट्रोलपंपावर जाऊन स्वतः पेट्रोल भरले आहे.
या पेट्रोलपंपावर गेल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकाला सॅनिटायझर दिले जाते. त्यानंतर तेथील कर्मचारी संबंधित ग्राहकाला पेट्रोल कसे भरायचे याविषयी सूचना देतो. त्यानंतर पुढची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकालाच करावी लागते. आत्मनिर्भर पेट्रोलपंप सुरु करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.
पाहा व्हिडीओ : 'जस्टीस फॉर एम्पलॉईज' ऑनलाईन मोहिम, IT क्षेत्रावर बेरोजगारीची कुऱ्हाड
आत्मनिर्भर पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून बाहेर पडणारे सुभाष घोंगे म्हणाले, 'पेट्रोल भरताना कर्मचाऱ्यांनीच पेट्रोल चोरी केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल भरल्यानंतर आपल्याला खरंच योग्य पेट्रोल मिळालं का? अशी शंका मनात असते. परंतु या आत्मनिर्भर पेट्रोलपंपामुळे मनातली या शंका दूर होतील. कारण आपण स्वतः झिरो सेट करण्यापासून ते पेट्रोल गाडीत टाकेपर्यंत सर्व प्रक्रिया करीत असतो. त्यामुळे आपण स्वतः निर्धास्त असतो. यामुळे पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होईल.'
आत्मनिर्भर पेट्रोलपंपाचे मालक असलेले गिरीश मानकर यासंदर्भात बोलताना म्हणाले की, 'पेट्रोलपंपावर पेट्रोल भरताना कर्मचारी पेट्रोल मारतात अशा अनेक पुणेकरांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे. आमच्या येथे येणाऱ्या ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे ही यामागची भावना आहे. दोन दिवसांपासून आम्ही हा प्रयोग सुरु केला असून लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
अत्याधुनिक कॅप्टन अर्जुन करणार प्रवाशांचे स्क्रीनिंग; मध्य रेल्वेचा इनोव्हेटिव्ह रोबो
सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका
पुण्यात लॉकडाऊनमध्ये अकरावीची परीक्षा घेण्याचा धक्कादायक प्रकार!