पुणे : रेल्वे मंत्रालयाने काही विशेष एक्सप्रेरेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे अनेकांना covid-19 ची लागण देखील झाली आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक असा रोबोट बनवला आहे, जो स्वतःहून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करू शकतो. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष देखील ठेवू शकतो.


मध्य रेल्वेने तयार केलेल्या या रोबोटचे नाव 'कॅप्टन अर्जुन' असे ठेवण्यात आले आहे. पुणे स्थानकात शुक्रवारी या रोबोटचे उद्घाटन करण्यात आले. आर.पी.एफचे महासंचालक अरुण कुमार यांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचे उद्घाटन केले. यावेळी पुणे स्थानकात मध्य रेल्वेचे महासंचालक संजीव मित्तल, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त आलो बोहरा असे अनेक अधिकारी उपस्थित होते.



कॅप्टन अर्जुन या एका रोबोटद्वारे मध्य रेल्वे वेगवेगळी कामे करू शकणार आहे. हा रोबोट स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक पॅसेंजरची थर्मल स्क्रिनिंग करू शकतो. तसेच स्टेशनवर होणाऱ्या असामाजिक घटनांवर नजर ठेवू शकतो. गेल्या काही दिवसात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना देखील covid-19 ची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यासाठीच कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटमध्ये मोशन सेन्सर, अत्याधुनिक कॅमेरे आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. 0.5 सेकंदात हा प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करतो आणि जर एखाद्या प्रवासाचे तापमान जास्त असेल तर अलार्म वाजवून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देतो. त्याचप्रमाणे हा दोन्ही बाजूंनी संवाद साधू शकणारा रोबोट आहे. तसेच तो स्थानिक भाषांमध्ये देखील बोलू शकतो. याची आणखीन एक खासियत म्हणजे, हा स्थानकात फिरू शकतो आणि सोबत जमीन देखील सॅनिटाईझ करू शकतो. यामध्ये सेन्सरद्वारे
सॅनिटायझर आणि मास्क देण्याची क्षमता देखील आहे.


पाहा व्हिडीओ : अत्याधुनिक Captain Arjun करणार प्रवाशांचे स्क्रीनिंग; मध्य रेल्वेचा इनोव्हेटिव्ह रोबो



सध्या पुणे स्थानकात या रोबोटची ड्युटी लावण्यात आली आहे. यावेळी महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नाविन्याची प्रशंसा केली आणि ते म्हणाले, 'रोबोटिक कॅप्टन अर्जुन प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण देईल आणि त्यांच्या देखरेखीमुळे वाढीव सुरक्षा मिळेल'. अशा अत्याधुनिक उपकरणांची सध्या सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना गरज आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी; मार्गदर्शक तत्वे तयार, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा


10 वी, 12 वी निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; बोर्डाकडून आवाहन