पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय हे पैसेवाल्या आरोपींचे दुसरे घर बनल्याचं दिसत आहे. येरवडा कारागृहात कैदेत राहण्याचं टाळण्यासाठी हे आरोपी उपचारांचं कारण देऊन ससून रुग्णालयात भरती होतात आणि पुढे महिनोनमहिने ससूनमधेच तळ ठोकतात. त्यासाठी येरवडा कारागृहातील अधिकारी आणि ससूनमधील अधिकारी यांना लक्ष्मी दर्शन घडवलं जातं. ड्रग माफिया ललित पाटील हा ससूनमध्ये पोलिसांच्या पहाऱ्यात राहूनच ड्रॅग रॅकेट चालवत होता आणि त्यासाठी त्याला मोबाईल फोन आणि इतर सगळ्या आवश्यक गोष्टी मिळत होत्या. एवढंच काय तर कोट्यवधी रुपयांचं ड्रॅग देखील त्यानं जवळ बाळगलं होतं. त्यामुळं ससूनमध्ये भरती होऊन सगळे आराम मिळवण्याकडे आरोपींचा कल दिसून येतो. पुण्यातील काही महत्वाच्या गुन्ह्यांमधील आरोपी किती दिवस ससूनमध्ये तळ ठोकून आहेत पाहुयात... 


- राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. मात्र गेल्या 130 दिवसांपासून त्यांचा मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये आहे . 


- पुण्यातील रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाणा हा कॉसमॉस बॅंकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अटकेत आहे. त्याच्यावर ईडीने देखील कारवाई केली होती. मात्र तो देखील गेल्या पन्नास दिवसांपासून ससूनमध्ये आहे.


-हेमंत पाटील - खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यातील या आरोपीवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र तो देखील गेले 41दिवस  ससूनमध्ये राहत आहे. 


- विरल सावला हा मटका किंग मागील 247 दिवस ससूनमध्ये तळ ठोकून आहे

-पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा पुतण्या रुपेश मारणे हा देखील ससूनमध्ये 47 दिवस तळ ठोकून आहे . 


-हरिदास साठे हा कुख्यात गुंड 72दिवस ससूनमध्ये राहत आहे. 


-ललित पाटीलदेखील जून महिन्यापासून ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. येरवडा कारागृहातील अधिकारी आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आलं होत. त्याच्यावर कधी टी . बी. चे कधी अल्सर चे उपचार करायचे आहेत, असं सांगण्यात आलं तर ड्रॅग रॅकेट चालवताना सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचं हर्नियाच ऑपरेशन करण्याची शिफारस ससूनमधील डॉक्टरांनी केली होती आणि त्या दरम्यानच तो पळून गेला होता.


इतर महत्वाची बातमी-


Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळाला की त्याला पळवला? CCTV फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर