पुणे : पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणात (Sasoon Hospital Drug Racket) राज्य सरकारकडून नेमण्यात आलेली चार सदस्यीय चौकशी समिती म्हणजे फार्स असल्याचा आरोप करतानाच या प्रकरणात भाजपच्या एका मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर ड्रग माफिया ललित पाटीलचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यामध्ये ललित त्याचा साथीदार अभिषेक बालकावडेला एका सोसयटीत भेटताना दिसत आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची व्यप्ती वाढत चालली आहे आणि ललित पाटीलला पकडण्यासाठी पुणे पोलिसांवर दबावही वाढत आहे.
ललित पाटीलच्या 'लीला' समोर...
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पुण्यातील सोमवार पेठेतील एका सोसायटीत तो त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला भेटताना दिसतो आहे. त्यामुळं ललित पाटील फक्त कागदावरच येरवडा कारागृहात होता, प्रत्यक्षात मात्र पुण्यात त्याचा मुक्त संचार सुरु होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ललित पाटीलच्या या लीला त्याला असलेल्या राजकीय आशिर्वादामुळं सुरु होत्या, असा विरोधकांचा आरोप आहे. ललितला पाठीशी घालण्यात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांचं नाव विरोधकांनी घेतलेलं असतानाच आता या प्रकरणात भाजपच्या एका मंत्र्यांचा देखील हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
ललित पाटील पळून जाऊन तब्ब्ल दहा दिवस उलटल्यानंतर राज्य सरकारकडून चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आणि शुक्रवारी या समितीने पुण्यात येऊन कामाला सुरुवातही केली. पण ससूनच्या डीनची चौकशी करण्यासाठी त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यानं ही चौकशी समिती म्हणजे फार्स असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधक बबिनबुडाचे आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.
रोज नवे खुलासे समोर...
इकडे पालमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या अजितदादांनी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चांगलीच खरडपट्टी काढली. सध्या प्रचंड दबावाखाली असलेल्या पुणे पोलिसांनी शुक्रवारी ललिताचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बालकवडेला घेऊन नाशिक गाठलं आणि त्यांच्या घराची झाडाझडती घेतली ज्यामध्ये अभिषेक बालकावडेच्या घरातून तीन किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. ससूनमधील या ड्रग रॅकेट प्रकरणात दरररोज नवनवे खुलासे होत आहेत आणि राजकीय आरोप - प्रत्यारोपांची देखील होत आहेत. मात्र जोपर्यंत ललित पाटील हाती लागत नाही तोपर्यंत ससूनच्या या ड्रग रॅकेट प्रकरणातील गूढ कायम राहणार आहे.
पोलीस, ससून व्यवस्थापनानंतर आता राजकीय नेत्यांवर संशय
ससूनमधील या ड्रग्ज रॅकेटमुळे फक्त प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसच नाही तर आता राजकीय नेतेदेखील संशयाच्या फेऱ्यात यायला सुरुवात झाली. संशयाचं हे वातावरण नाहीस करायचं असले तर चौकशी आणि कारवाईचा नुसता फार्स करून चालणार नाही तर सर्वसामान्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. ललित पाटील बद्दलची ही उत्तरं किती प्रामाणिकपणे दिली जातात यावर या सरकारी यंत्रणांची आणि पर्यायाने सरकारची विश्वासहार्यता अवलंबून असेल.
इतर महत्वाची बातमी-