पिंपरी चिंचवड : 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या तोंडावर प्रेमाचं प्रतीक असलेला गुलाब महागणार आहे. गुलाबाच्या किमती पाच ते दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
प्रियकर-प्रेयसीला 'गुलाबी स्वप्न' दाखवणारा गुलाब यंदा शेतकऱ्यांना अधिकच्या गुलाबी नोटा मिळवून देणार आहे. 'व्हॅलेंटाईनचा मौसम' संपताच लग्नसराई असल्याने देशात गुलाब कमी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच एका गुलाबामागे पाच ते दहा रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.
'व्हॅलेंटाईन्स डे'ला जगभरातील प्रेमवीरांच्या हातात दिसणारा गुलाब हा पुण्याच्या मावळमधला. मावळ तालुक्यातील शेतकरी सव्वा दोनशे हेक्टरवरील शेतीवर हा गुलाब पिकवतात, तोच गुलाब आता निर्यातीस सज्ज झाला आहे.
बागायतीपेक्षा गुलाब शेतीत शेतकरी लाखो रुपयांत खेळू लागले. हे पाहून कृषी क्षेत्रात पदवी मिळवलेल्या नोकरदारांनी या क्षेत्रात उडी घेतली. ते सध्या यशस्वी झाले आहेत. नोकरीपेक्षा मिळणारं उत्पन्न हे केवळ दुप्पट नाही, तर दहापटीने वाढलं आहे.
'व्हॅलेंटाईन्स डे'साठी भारतातून देशभर निर्यात होणाऱ्या गुलाबामध्ये मावळ तालुक्याचा वाटा तब्बल 60 टक्क्यांचा असतो. देशभरातून 2017 साली 19 कोटी, तर 2018 साली 23 कोटी निर्यात झालेल्या गुलाबाला यंदा दहा टक्के मागणी वाढली आहे. त्यामुळे ही उलाढाल तीस कोटींच्या घरात जाईल, असा विश्वास इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्सने व्यक्त केला आहे.
परदेशात गुलाब निर्यातीची सुरुवात 1991 साली टाटा यांनी केली. 2000 सालच्या सुरुवातीला निर्यातीवर संक्रांत आली. परिणामी गुलाब शेती डगमगली. पण अलिकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या जोरावर गुलाब शेतीने भरारी घेतली. जानेवारीअखेर आणि फेब्रुवारीचा पहिला आठवडा हा गुलाब निर्यातीसाठी ठरलेला.
यंदा परदेशातून दहा टक्के अधिकची मागणी वाढल्याने साहजिकच देशात गुलाब कमी पडणार, त्यातच व्हॅलेंटाईन संपताच लग्नसराई. हे पाहता मावळमधल्या शेतकऱ्यांचा व्हॅलेंटाईन हा गुलाबी नोटांनी साजरा होईल, तेव्हाच भारतातील प्रेमीयुगलांच्या खिशाला झळ देणाराही ठरेल, हे नक्की.
'व्हॅलेंटाईन्स डे'च्या तोंडावर गुलाब महागणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2019 06:15 PM (IST)
'व्हॅलेंटाईन्स डे'साठी भारतातून देशभर निर्यात होणाऱ्या गुलाबामध्ये मावळ तालुक्याचा वाटा तब्बल 60 टक्क्यांचा असतो. देशभरातून 2017 साली 19 कोटी, तर 2018 साली 23 कोटी निर्यात झालेल्या गुलाबाला यंदा दहा टक्के मागणी वाढली आहे. त्यामुळे ही उलाढाल तीस कोटींच्या घरात जाईल, असा विश्वास इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्सने व्यक्त केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -