नवी दिल्ली : पुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे एमडी ब्रजेश दीक्षित यांनी दिली. महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले.


पुणे मेट्रोसाठी 2000 कोटी रुपये अर्थसहाय्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार आज राजधानी दिल्लीत पार पडला. त्यावेळी ब्रजेश दीक्षित बोलत होते.

पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन फेजमध्ये एकूण 31 किमी मेट्रोचं काम पहिल्या फेजमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे पुणे मेट्रोची जी खास वैशिष्ट्ये आहेत, त्यात संभाजी पार्क आणि डेक्कन ही दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याचीही माहिती यावेळी महामेट्रोकडून देण्यात आली. महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले.

फ्रान्स डेव्हलपमेंट बँकेकडून 1.2 टक्के दराने हे कर्ज 20 वर्षासाठी महामेट्रोला मिळणार आहे. या कर्जामुळे पुणे मेट्रोची पहिली फेज 2020 पर्यंत सुरु करण्याचं जे लक्ष्य आहे ते गाठण्यात मदत होईल, असा विश्वास ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. एकूण 11 हजार 400 कोटी रुपयांचा पुणे मेट्रोचा प्रकल्प आहे. त्यात पुढच्या दोन तीन आठवड्यात युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेकडूनही 4 हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर होईल, असा आशावाद महामेट्रोच्या एमडींनी व्यक्त केला.

सध्या महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये मेट्रोचं काम सुरु आहे. महामेट्रोच्या मॅपवर महाराष्ट्रातलं पुढचं शहर कुठचं असणार, या प्रश्नावर त्यांनी ठाण्यात डीपीआरला मंजुरी मिळाली असून नाशिकमध्येही मेट्रोचा डीपीआर बनवण्याचं काम सुरु आहे असं सांगितलं.