पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटर आता प्रशासन स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. लाईफ लाईन या कंत्राटदाराकडील जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. लाईफ लाईनने भरलेल्या स्टाफपैकी 40 डॉक्टर आणि 80 नर्सने राजीनामा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. याच जम्बो हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही मृत्यू झाला होता, त्यानंतर कोविड सेंटरचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या बैठकीत लाईफ लाईनला ते जमत नसेल तर त्यांच्याजागी दुसऱ्या संस्थेला काम देण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने ही पावलं उचलली जात आहेत. पुणे महानगरपालिकेने चार अधिकाऱ्यांना जंबो कोविडची जबाबदारी दिली आहे. प्रत्येकी सहा तासांची ड्युटी या अधिकाऱ्यांना लावली असून दोन अधिकारी राखीव ठेवलेले आहेत.


पुण्यातील हे जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप वारंवार करण्यात येत आहे. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत आणखी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यातील कोवि़ड-19 ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल 80 कोटीहून अधिक खर्च आला आहे. परंतु हे रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने वाढत आहे. रुग्णालयात पुढे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.


पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शरद पवार यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना


पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या रुग्णालयात 800 बेडची क्षमता असतानाही सध्या 330 बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे 'जम्बो'बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. महापालिकेकडून याठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. रूग्णांची कुठलेही हाल होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. ज्या लाईफ लाईन एजन्सीला हे काम देण्यात आलेलं होतं हे सगळे डॉक्टर आणि नर्सेस त्या एजन्सीचे आहेत. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.