पुणे: पुण्यातील वाघोली केसनंद परिसरात काल (रविवारी) रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. एका डंपरने फुटपाथवरती झोपलेल्या कामगारांना चिरडलं. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची पुनरावृत्ती मावळमध्ये टळली आहे. पुण्यातील शिरगावमध्ये चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ट्रक दुकानात जाता-जाता राहिला, अन्यथा वाघोलीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती.
नेमकं काय घडलं?
या अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर सिमेंटच्या विटा चार चाकी आणि दुचाकीवर कोसळल्या. काही विटा दुकानात देखील पडल्या. ट्रक दुकानात घुसला असता तर वाघोली प्रमाणे इथं ही काहींना आपला जीव गमवावा लागला असता. शिरगाववरून हा ट्रक सोमटने फाट्याच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. चालक पोलिसांच्या ताब्यात असून तो दारूच्या नशेत होता का? याचा तपास तळेगाव पोलीस करत आहेत.
वाघोली केसनंद परिसरात भीषण अपघात
वाघोली केसनंद परिसरामध्ये काल (रविवारी) रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे.
पुणे पोलिसांनी दिली माहिती
पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये घडलेल्या अपघाताबाबत पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की, ही अतिशय गंभीर घटना आहे. डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. तो अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत आहे की नाही हे तपासण्यासाठी मेडिकल टेस्ट सुरु आहे. ड्रायव्हर 26 वर्षाचा आहे. हलगर्जीपणा दिसला तर कारवाई करण्यात येणार आहे. वर्षभरात 72 अपघात जड वाहनामुळे झाले आहेत. बंगलोर बायपासजवळ जास्त अपघात झाले आहेत. रात्रीच्यावेळी डंपर आणि जड वाहनांचे अपघात होतात. पुण्याच्या बाहेरील भागात हे अपघात होतात. निवारा मिळाला नाही म्हणून ते फूटपाथवर झोपले. यात कामगारांची चूक नाही. कारण अपघात फुटपाथवर झाला आहे. डंपरवर काही प्रमाणात बंधन आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती अमरावतीचे आहेत. कामासाठी पुण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृत झालेल्यांची नावं
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावं
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे