पुणे: पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये काल (रविवारी) रात्री उशीरा बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना वाघोलीतील केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. या ठिकाणी जवळपास 40 जण होते, रात्री नेमकं काय घडलं त्याबाबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही सगळे अमरावतीचे आहोत. अमरावतीवरून या ठिकाणी विविध कामांसाठी आलो होतो. मात्र काल रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली, आणि आमच्या कुटुंबातले तीन जण यात गेले. आमची हीच अपेक्षा आहेत की आता आम्हाला घरादराची व्यवस्था करावी. आमच्या गावी कोणतीही सोय नसल्यामुळे आम्हाला काम कामासाठी पुण्यात यावं लागतं मात्र, राहायची सोय नसल्यामुळे अशा पद्धतीने फुटपाथवर देखील झोपायला लागतं. अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचे निष्पाप बळी गेलाय, असं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.
शिरूरचे आमदार माऊली कटकेंनी केली घटनास्थळाची पाहणी
शिरूरचे आमदार माऊली कटकेंनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. वाघोली परिसरातली ट्रॅफिकची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहेत आणि या संदर्भातला प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आहे. रांजणगावातील कंपन्यांमध्ये अनेक कामगार काम करतात. मोठी ट्राफिकची समस्या आहे, या रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
पुणे पोलिसांनी दिली माहिती
पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये घडलेल्या अपघाताबाबत पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की, ही अतिशय गंभीर घटना आहे. डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. तो अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत आहे की नाही हे तपासण्यासाठी मेडिकल टेस्ट सुरु आहे. ड्रायव्हर 26 वर्षाचा आहे. हलगर्जीपणा दिसला तर कारवाई करण्यात येणार आहे. वर्षभरात 72 अपघात जड वाहनामुळे झाले आहेत. बंगलोर बायपासजवळ जास्त अपघात झाले आहेत. रात्रीच्यावेळी डंपर आणि जड वाहनांचे अपघात होतात. पुण्याच्या बाहेरील भागात हे अपघात होतात. निवारा मिळाला नाही म्हणून ते फूटपाथवर झोपले. यात कामगारांची चूक नाही. कारण अपघात फुटपाथवर झाला आहे. डंपरवर काही प्रमाणात बंधन आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती अमरावतीचे आहेत. कामासाठी पुण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपातवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन हा मुळचा नांदेडचा आहे, अपघातातील मृत कामगार हे मुळचे अमरावतीतील आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी कामगारांवरती सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार आहेत रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते.
मृत झालेल्यांची नावं
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावं
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे