पुणे : पुणे-मुंबई प्रवास, अपघात आणि वाहतूक कोंडी हे समीकरण सर्वश्रुत आहे. हे समीकरण चर्चेत येण्याला बोरघाट हे सर्वाधिक कारणीभूत ठरतं. पण सरत्या वर्षात कोरोनामुळे या समीकरणावर अधिकचं काम झालं आणि याचे सकारात्मक परिणाम ही दिसून आलेत. त्यामुळेच 12 किलोमीटरच्या बोरघाटात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्के अपघात कमी झाले तर दुसरीकडे वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून विक्रमी सहा कोटी 38 लाखांचा दंड ही ठोठावण्यात आला. पण मृतांची संख्या मात्र म्हणावी इतकी कमी झाली नसल्याचं चित्र आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्थात राष्ट्रीय महामार्ग नंबर चार या मार्गावरील ताण कमी करण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. पण या दोन्ही मार्गावरून प्रवास करताना बोरघाट हमखास लागतोच. त्यामुळे या बोरघाटातील ताण काही केल्या कमी झाला नाही. परिणामी बोरघाटात अपघात आणि वाहतूक कोंडी ही प्रवाशांना रोजच भोगावी लागते. सहा पदरी असणारा द्रुतगती मार्ग मृतांजन पुलाजवळ चार पदरीचा असल्याने, इथं वाहतूक मंदावते. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा पहायला मिळतात. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण परिस्थिती जैसेथेच. अशातच भारतात कोरोनाने शिरकाव केला, देश लॉकडाऊन झाला. या लॉकडाऊनने पदोपदी नकारात्मक बाबी समोर आणल्या, पण हाच लॉकडाऊन द्रुतगती मार्गासाठी सकारात्मक ठरला.

लॉकडाऊनमुळे पुणे-मुंबई मार्गावर केवळ जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू होती. त्यांचं प्रमाण ही केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच होतं. हीच बाब अमृतांजन पूल हटविण्यासाठी फायद्याची होती. म्हणूनच प्रशासनाने 5 एप्रिल 2020चा मुहूर्त ठरवत हा ऐतिहासिक अमृतांजन पूल जमीनदोस्त केला. दुसरीकडे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगरण्यात आला. यातच अवजड वाहनांकडून केल्या जाणाऱ्या लेन कटिंगचा फटका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना ही बसला. मग दस्तुरखुद्द गृहराज्यमंत्र्यांनी द्रुतगती मार्गावर उभं राहून अजवड वाहतुकीला चाप बसविण्याचे आदेश दिले. त्यामुळे बोरघाटात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरील कारवाईला वेग आला. परिणामी बारा किलोमीटरच्या बोरघाटात अपघाताची संख्या ही पन्नास टक्क्यांनी कमी झाली. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पट अधिक म्हणजेच सहा कोटी 38 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. पण मृतांची संख्या मात्र अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही.

बोरघाटातील अपघाताची तुलना

वर्ष  अपघात  मयत  जखमी
2019 160 40 144
2020 81 30 63

बोरघाटातील कारवाईची तुलना

वर्ष वेग मर्यादा लेन कटिंग इतर एकूण दंड
2019 8465 55674 23451 87590 10442450
2020 37179 70096 38401 145476 63819350

लॉकडाऊनच्या काळात पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ही कमालीची कमी झाली होती. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचं काही तज्ञ सांगतात. मात्र बेशिस्त वाहतूक करून वाहतूक कोंडीला आमंत्रण देणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी कारवाईचा उगरलेला बडगा ही अपघाताचे प्रमाण कमी करण्यास महत्वपूर्ण ठरली आहे. हे वरील आकडेवारी स्पष्ट करते. त्यामुळे ही कारवाई पुढे ही कायम ठेवायला हवी. तेंव्हाच पुणे-मुंबई प्रवास, अपघात आणि वाहतूक कोंडी या समीकरणाच्या चर्चेला कायमचा पूर्णविराम लागेल.

बोरघाटात होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहतुकच कारणीभूत ठरते. त्यामुळे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी ही दंडात्मक कारवाई करावी लागते. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवत आहेत. प्रत्येक प्रवाश्याचा प्रवास सुखकर करण्याचा यामागचा हेतू आहे. हा हेतू पूर्ण होईपर्यंत कारवाई सुरूच राहील. ही कारवाई टाळायची असेल तर वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविना कोणताच पर्याय नाही, असं बोरघाट वाहतूक, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी सांगितलं.