बारामती : पिंगोरी हे पुरंदर तालुक्यातील डोंगर कुशीत वसलेले गाव. गावाच्या चारही बाजूनी डोंगर आहे. पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच गावात ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यासाठी कारण आहे वाहतुकीसाठी लागणारा रस्ता आणि गावात नसलेला टॉवर.


पिंगोरी गावात एकही मोबाईल टॉवर नाही आणि दीड वर्षांपासून मंजूर झालेला रस्त्याची दुरुस्ती अजूनही पूर्ण झालेली नाही. म्हणून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या गावाची ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 इतकी आहे. त्यासाठी 26 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी 26 च्या 26 उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकला. साकुर्डे ते वाल्हे या रस्त्याची दुरुस्ती मंजूर केली आहे. साकुर्डे ते वाल्हे हा 16.5 किलोमीटरचा रस्ता असून त्या रस्त्यासाठी 8 कोटी 25 लाख इतका निधी देखील मंजूर झाला आहे..


पिंगोरी गावाची लोकसंख्या 2 हजारच्या आसपास आहे. मतदान 1300 इतकं आहे. एवढं असूनही गावात मोबईलला रेंज नाही. कोरोनानंतर सगळं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने दिल जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर डोंगरावर जाऊन बसावं लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो.


लोक सहभागातून या गावाने अनेक कामे केली आहेत. तरी देखील या गावाची दुरवस्था झाली आहे. गावात पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ना गावात रेंज आहे ना गावात दवाखान्याची सोय आहे. गावात गेल्या 8 महिन्यापासून एसटी देखील आली नाही. हे गाव सैनिकांचे असल्याने जवानांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 साली या गावात जल संधारणाचे काम पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी पिंगोरी या गावाने जलसंधारणाच्या कामात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा रस्ता दुरुस्ती देखील मंजूर झाला होता. पण त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पिंगोरी गावाने जो एकमताने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे आता तरी प्रशासनला जाग येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.