बारामती, पुणे : सद्यस्थितीची परिस्थिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवलीय, आशा मथळ्याखाली निनावी पत्र लिहण्यात आले आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रावर राजेंद्र पवारांनी (Rajendra Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा लोकांना दाबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात. तसेच अनेक राजकीय जुन्या गोष्टींचा राजेंद्र पवारांनी सांगितल्या आहेत. जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती, असे राजेंद्र पवार म्हणाले आहेत.
राजेंद्र पवार नेमकं काय म्हणाले?
या व्हायरल झालेल्या पत्रावरुन एबीपी माझाशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती. 1990 च्या दरम्यान मी राजकारणात आलो असतो पण नाही आलो. ज्यावेळी लोकांना दडपशाही झाली असं वाटतं तेव्हा लोक निनावी पत्र वाटायला सुरुवात करतात, असं मला वाटतं. काही बारामतीकरांची खदखद या पत्रातून बाहेर पडत आहे. अजित पवार आणि मी दोघंही एकाच वयाचे आहोत. 1987 नंतर अजित पवार राजकारणात आले. त्यानंतर ते पुढे गेले. मी शरद पवाराचा पुतण्या आहे. त्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की मलादेखील राजकारणाची आवड आहे. पण मी परदेशातून आल्यानंतर शेती करत होतो. मी सतत राजकारणात राहिलो असतो तर शेतीकडे दुर्लक्ष झालं असतं. मात्र मी सामाजिक कामं करत राहिलो. बारामती अॅग्रोचं काम पाहिलं. व्यावसायाचा पाया पक्का केला. त्यानंतर रोहित पवारांना हा पक्का केलेला पाया मी दिला.
सध्या सोशल मीडियावर बारामतीकरांची भूमिका या मथळ्याखाली दिलेल्या निनावी पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काय आहे पत्रात आपण पाहूयात...
अजित दादा पवार यांनी हे प्रकरण विनाकारण भाव भावकीच्या तालावर आणून ठेवले
पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण होतं. स्वर्गीय शारदाबाई पवार या त्या वेळीच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर आप्पासाहेब पवार (रोहित पवारांचे आजोबा) आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापाचं काम करू लागले. पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढची पिढी जेव्हा राजकारणात तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी आनंदरावांच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले. दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले. तेव्हा राजेंद्र पवार यांनी बंड केले नाही. पुढचा इतिहास माहीतच आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवार यांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सर्वसामान्य बारामतीकारांची हीच भूमिका आहे वाजवा तुतारी गाडा गद्दारी.
इतर महत्वाची बातमी-
Vasant More : वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट का घेतली?, कारण आलं समोर...