पुणे:  पुरंदर आणि बारामती तालुक्यातील 72 वाडी वस्ती आणि गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण शंभर टक्के भरले. या धरणाच्या स्वयंचलित सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरुवात झाली. या धरणाची साठवण क्षमता ही पाऊण टीएमसी इतकी आहे. मागील चार-पाच दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे नाझरे धरण पूर्णपणे भरून आता त्याच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा पात्रात जाऊ लागले आहे. त्यामुळे पुरंदर व बारामतीच्या जनतेला दिलासा मिळाला आहे. मागील सहा ते सात महिन्यापासून नाझरे धरण कोरडे पडले होते ते नाझरे धरण 100 टक्के भरले आहे. तर पुरंदरसह बारामतीतील 72 वाड्या,वस्ती आणि गावे यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.


नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे. पुरंदरमधील 40 आणि बारामतीतील 16 गावांना वरदान नाझरे धरण वरदान आहे. मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने या उन्हाळ्यात नाझरे धरण कोरडे ठाक पडले होते. या धरणाला भेगा पडल्या होत्या. पंरतु यंदा पाऊस चांगला झाल्याने नाझरे धरण 9 भरले आहे. कऱ्हा नदीवर असलेलं हे नाझरे धरण 100 टक्के भरले असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पाऊण टीमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. 


56 गावांची पाण्याची चिंता मिटली


 या धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. तर सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एम आय डी सी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. नाझरे धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  


राज्यातील बहुतांश धरणे भरली


राज्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून  पावसाच्या पाण्याने धरणे तुडुंब होत आहेत.  पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरण, चाकसमान , पवना , खडकवासला, पानशेत , डिंभे भरले आहे.  सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा,मुठा, भीमा, मीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे. त. पुणे नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणी साठा शिल्लक आहे. कोकणातील धरण साठा 90 च्या पुढे गेला असून मराठवाडा, अमरावती व नागपूर विभागात पाणी पातळीत वाढ होत आहे.