पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनिषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदे विकल्यानंतर अवघे चार मिळाले. संतापलेल्या मनिषा यांनी ते चार रुपये केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना मनीऑर्डर केले आहेत.


कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मनिषा बारहाते यांनी कांद्याच्या 32 गोण्या पारनेर येथील एका व्यापाऱ्याला विकल्या होत्या. साधारण एक ते दोन रुपये किलो त्यांच्या कांद्याला भाव मिळाला. त्यातून त्यांना 2362 रुपये एवढी रक्कम मिळाले, मात्र इतर सर्व खर्च वजा करता त्यांना 32 गोण्यांचे केवळ चार रूपये हातात मिळाले.


मात्र एवढ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला अवघे चार रुपये मिळाल्याने संतापलेल्या मनिषा यांनी मिळालेली रक्कम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग मनीऑर्डर केली. तसेच कृषिमंत्र्यांच्या पत्नीला बांगड्यांचा बॉक्स पाठवून आपला सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला. मनिषा यांच्या या कृतीचे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.


गेली चार वर्षात सरकारने शेतीमालाच्या भावाचे नियोजन न करता शेतकरी कशाप्रकारे अडचणीत येईल यासाठी धोरणे राबविली आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा वाढत आहे. कर्ज माफीच्या नावाखाली सरकारने लोकांना फसवलं आहे. कांद्यांच्या उत्पन्नातून शेतकरी कर्जाचे व्याज भरेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यालाही भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, असं मनिषा बारहाते म्हणाल्या.


शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले सगळे पैसे मनीऑर्डरने मोदींना पाठवले!


नाशिकच्या संजय साठे या शेतकऱ्याने त्यांच्या सात क्विंटल 50 किलो कांद्याला लासलगाव बाजारसमितीत केवळ 1 हजार 64 रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान कार्यालयातील आपत्कालीन निधीसाठी देत सरकारचा निषेध केला होता.



संबंधित बातम्या


कांदा विकून पाठवलेल्या मनीऑर्डरची मोदींनी घेतली दखल


मंत्री ऐकत नसल्यास कांदे फेकून मारा : राज ठाकरे