पुणे : संचालकाच्या पत्नीने आपला एमई विषयाचा पेपर चक्क प्राध्यापकाकडून सोडवून घेतल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातल्या नऱ्हे भागात असलेल्या झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका प्राध्यापकानं विद्यापीठासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकामुळे खळबळ उडाली आहे.


झील एज्युकेशन सोसायटीचे संचालक जयेश काटकर यांच्या पत्नी स्नेहल जगताप एमईचं शिक्षण घेत आहेत. पहिल्या वर्षाचे पेपर दबाव टाकून सोडवून घेतल्याचं संबंधित प्राध्यापकाने तक्रारीत म्हटलं आहे. आपण पेपर सोडवताना परीक्षार्थी जगताप प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसून राहत असल्याचं त्यांनी सांगितलं.

या गैरप्रकारात आल्यालाला माफीचा साक्षीदार करावं, अशी मागणीही प्राध्यापकाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली आहे. या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. तक्रारदार प्राध्यापक रसायनशास्त्र विभागात प्रथम वर्षाला सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विद्यापीठाने या गोष्टीची दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समितीही नेमण्यात आली आहे. येत्या 13 तारखेला या समितीकडून संस्थाचालक आणि तक्रारकर्त्याला चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.