पुणे : पुणे शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव (Pune Weather Update) कमी झाला असला तरी उन्हाचा चटका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून 37.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ढग निरभ्र झाल्याने पुढील तीन दिवस कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शनिवारी (11 मे) व रविवारी (12) शहरात जोरदार पाऊस झाला. परिणामी, शहराचे कमाल तापमान - जे पूर्वी 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते - 31 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने शहरवासियांना काहीसा दिलासा दिला होता, मात्र तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली. लोहगाव येथे 36 अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर येथे 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहर व परिसरात गुरुवारी 16 मेला दुपारपर्यंत प्रामुख्याने आकाश निरभ्र होतं, ढगाळ वातावरण होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी ( 17 मे) आणि शनिवारी (18 मे) पुण्यात कमाल तापमानात 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल, तर रविवारी (19 मे) तापमान 40 अंशसेल्सिअसपर्यंत पोहोचेल.
राज्यातलं वातावरण कसं असेल?
पुढील 24 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरीमुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील. काल कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्येही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. तर पंढरपुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
ही बातमी वाचा:
- Travel : रिमझिम पाऊस..निसर्गसौंदर्य अन् बेभान मन! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं पाहाल, तर सगळं टेन्शन विसराल..
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
- Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!