Vasantotsav Pune :  मागील 15 वर्षांपासून पुणेकरांना संगीताची मेजवानी देणाऱ्या वसंतोत्सव कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली आहे. हा उत्सव 20 ते 22 जानेवारी 2023 दरम्यान रंगणार आहे.  डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय
पुरस्कार विजेते प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. 


वसंतोत्सव महोत्सवाचे हे 16 वं वर्ष आहे. या वर्षीचा वसंतोत्सव कोथरूड परिसरातील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत पार पडणार आहे. सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, 'द रघु दीक्षित प्रोजेक्ट', प्रतिभा सिंह बघेल, विशाल भारद्वाज असे संगीत क्षेत्रातले दिग्गज यावर्षी वसंतोत्सवात सादरीकरण करणार आहेत. 


शास्त्रीय गायन, तालवाद्य, लाईट म्युझिक, लाईव्ह बँड यांबरोबर बहारदार गझल अशा एकाहून एक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी आम्ही वसंतोत्सवच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत, असे राहुल देशपांडे यांनी सांगितलं आहे.


दोन दिवस संगीताची मेजवानी
वसंतोत्सवच्या पाहिल्या दिवशी अर्थात शुक्रवार 20 जानेवारीच्या पहिल्या सत्रात पं. अजॉय चक्रवर्ती यांच्या कन्या आणि पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे सुरेल गायन होईल. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा शेवट कौशिकी चक्रवर्ती आणि राहुल देशपांडे यांच्या बहारदार सहगायनाने होईल. अशा पद्धतीने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच सादरीकरण करणार असल्याने हे महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे. तर 21 जानेवारीच्या पहिल्या सत्रात 'द रघु दीक्षित प्रोजेक्ट' या सुप्रसिद्ध कन्टेम्पररी आणि भारतीय लोकसंगीतावर आधारित बँडचे सादरीकरण होणार आहे. स्वत: रघु दीक्षित आणि सहकारी यावेळी सादरीकरण करणार आहे. यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रतिभा सिंह बघेल यांचे आणि गायक पृथ्वी गंधर्व यांचे एकल गझल गायन होईल. या दोघांनीही बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी गायन केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रात नावाजलेले कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे.


तिकीटं कसे बुक कराल?
या वसंतोत्सवची तिकीटे बुक माय शोवर 1 जानेवारी 2023 पासून उपलब्ध असणार असून सीझन तिकिटाचे दर हे  1800, 1200 आणि  500 रुपये आहेत. याशिवाय कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी देखील लवकरच तिकिटे उपलब्ध असणार आहेत.