Bhima Koregaon 1 January Preparation : भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी (Koregaon Bhima) होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाची पुणे जिल्हा (pune) प्रशासनाकडून जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला 10 ते 12 लाख भीम अनुयायी उपस्थित राहतील, असा अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 6500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देखील नजर ठेवण्यात येणार आहे. 


सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचं नागरिकांना आवाहन


पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार तयारीला सुरुवात झाली आहे. सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


कोविडनंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता 16 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 350 बसेस, 1400 तात्पुरती स्वच्छतागृहे, 20 रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने ही व्यवस्था करण्यात येणार आहे.


पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तैनात


आरोग्य सुविधेसाठी 140 वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि 6500 हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. परिसरातील खाजगी रुग्णालयांना खाटा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाला सोहळ्याच्या वेळी परिसरातील वाहतूक वळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरुन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा व्हावा यासाठी पोलीस नागरिकांशी समन्वय ठेऊन काम करेल. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाने सांगितलं आहे. यंदा मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन करण्यासाठी आल्यास कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.