मुंबई : राज्याची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे शहरातील गुन्हेगारी गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. ड्रग्ज, हत्या, गोळीबाराच्या घटनांनी पुणे शहर हादरुन गेलं आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी नगरसेवकाचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच, पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा नव्याचे चर्चेत आला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली. यातील काही आरोपींना चक्क ताम्हिणी घाटातून बेड्या ठोकल्या होत्या. आता, वनराज आंदेकर प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  


वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 


काय आहे वनराज आंदेकर खून प्रकरण?


पुण्यात सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्यानं वार केले. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला. घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तेरा ते चौदा जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. 


मोक्का कधी  लावला जातो?


गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 


मोक्का लागल्यावर शिक्षा काय मिळते ?


मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.


हेही वाचा


आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य