Pune Rain News :  पुणे शहरात (Pune)(Pune Rain) पुन्हा पावसाने जोर धरला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात देखील पाऊस पडत आहे. दोन दिवस पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. कोथरूड, धनकवडी, स्वारगेट, सहकार नगर परिसरात गारांचा पाऊस झाला आहे. आज आणि उद्या पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता. पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास आज पुन्हा पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. 


साधारण चारच्या सुरमारात पावसाला सुरुवात झाली. डेक्कन, प्रभात रोड, कोथरुड, सेनापती बापट रोड, स्वारगेट, टिळक रोड, धनकवडी आणि कात्रज परिसरात धुवांधार पाऊस पडला. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाने  पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली. मात्र अचानक आलेल्या पावासाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेक पुणेकरांनी प्रवास टाळला तर पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.


कात्रज घाट बनला मिनी कश्मीर...


पुण्यात मागील दोन दिवसांपासून संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच वेधशाळेने पुढील दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. आज झालेल्या गारपीटीने पुण्यातील कात्रज घाटाला मिनी काश्मीरचं स्वरुप प्राप्त झालं होतं. या गारपीटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मिर नाही तर कात्रज घाट आहे, असं कॅप्शन देत नेटकरी गारपीटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसत आहे.
 
दोन तासांच्या पावसानं वाहतूक कोंडी...


वाहतूक कोंडी ही पुण्यातील सगळ्या मोठी समस्या बनली आहे.ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र वाहतूक कोंडी संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच पाऊस झाला तर रस्ते तुंबतात आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आज संध्याकाळी पुण्यात दोनच तास पाऊस झाला मात्र या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. सेनापती बापट रोड, फर्ग्यूसन रोज, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, कोथरुड, वनाज आणि चांदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.  



रस्त्यांना नदीचं रुप..

पुण्यात काही वेळ पाऊस झाला ती रस्त्यांना नदीचं रुप आल्याचं बघायला मिळतं. आज स्वारगेट, सहकार नगर, कात्रज, पद्मावती परिसरात अनेक ठिकाणी पाणी साठल होतं. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.