पुणे : पुण्यातल्या माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी जाचक अटी घातल्या आहेत. शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी ठराविक हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करु नये अशाप्रकारचे नियम घालण्यात आले आहेत.


या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असंही या नियमांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

शाळेच्या डायरीत नमूद केलेले नियम-

- मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावीत.

- लिपस्टिक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत.

- कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही.

- 0.3 cm च्या आकारापेक्षा मोठे कानातले घालायचे नाही. त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरी असावा.

- सायकलच्या पार्किंगसाठी वार्षिक 1500 फी तसंच हेल्मेट सक्तीचं आहे.

- शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही.

- विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये.

दरम्यान, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेच्या प्रशासनाने सांगितलं आहे. मात्र पालकांनी माध्यमांसमोर जाण्याच्या आधी शाळेशी बोलायला हवं होतं, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.