पिंपरी चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज विचित्र अपघात घडला. दुभाजकावर धडकून लोखंडी पत्रा गाडीच्या आरपार गेल्यामुळे घडलेल्या अपघातात एकाला प्राण गमवावे लागले. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला.
द्रुतगती मार्ग सुरु होताच चालकाने गाडीचा वेग वाढवला. सोमाटणे फाट्याला गाडी पोहचली तेव्हा चालकाचा डोळा लागला. तेवढ्यात दुभाजकावर आदळून धातूमिश्रित डिव्हायडर गाडीतून आरपार गेला. अपघातामध्ये गाडीतील प्रवासी जखमी झाले.
उपचारादरम्यान अमोल शिवाजी पाटील यांची मृत्यूशी झुंज संपली. तर श्रीमंत कृष्णा भोंदे आणि प्रकाश गोविंद वरगडे यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. चालक सूर्याजी कृष्णा भोंदे यांना उपचार करुन सोडण्यात आले. सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.