चित्रकलेचे पुस्तक फाडल्याचा वाद, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2018 10:15 AM (IST)
शिक्षकांनी शाळेत येण्यास मनाई केल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथील खाणीत विद्यार्थ्याने उडी मारली. शुभम सुरवाडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
पिंपरी : शिक्षकांनी शाळेत येण्यास मनाई केल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथील खाणीत विद्यार्थ्याने उडी मारली आहे. शुभम सुरवाडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. एनडीआरएफचे जवान शुभमचा शोध घेत आहेत. मंगळवार संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. शिकवणी संपवून विठ्ठलनगरच्या दगडी खाणीकडे जात असल्याचं शुभमने मित्रांना सांगितलं होतं. मात्र तेथून शुभम परतलाच नाही. देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक-2 मध्ये शुभम शिक्षण घेत होता. चित्रकलेचे पुस्तक फाडल्यावरुन शाळेत शुभमचा मित्राशी वाद झाला होता. त्यानंतर शिक्षकांनी त्याला पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिली होती. शिक्षकांनी केलेल्या शिक्षेमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं शुभमने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. शुभमची सुसाईड नोट 'शुभम सुरवाडे, वर्ग दहावी 'ह', मी आत्महत्या करत आहे. कारण एका विद्यार्थ्यामुळं मला पाच दिवस शाळेत येऊ नको असं सांगण्यात आलं. हर्ष सिन्हा नावाचा मुलाने माझं चित्रकलेचं पुस्तक फाडलं. माझं पुस्तक भरून न दिल्यास आपली भांडणं होतील, असं म्हटल्यावर हर्षने त्याच्या इतर पाच-सहा मित्रांच्या कानावर ही बाब टाकली. त्यानंतर हर्षला काही बोललास तर आम्ही तुला मारहाण करु, अशी धमकी त्यांनी मला दिली. मात्र हर्षने मीच त्याला मारहाण केल्याचं शिक्षकांना खोटं सांगितलं. त्यामुळे शिक्षकांनी मला दिवसभर स्टाफ रूम बाहेर बसवून ठेवत माझ्यासह चौघांना सस्पेंड केलं. त्यामुळे मी जीव देत असून, माझ्या कुटुंबीयांना काही बोलू नका. मी हा निर्णय केवळ शिक्षकांमुळे घेत आहे आणि हर्षही खोटा बोलला.