Pune Bypoll election :   भाजपला कसबा आणि चिंचवडची  (Pune Bypoll Election) पोटनिवडणूक हाताळता आली नाही. कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा एकदा निकाल लागू द्या, मग चिंचवड आणि कसब्यात भाजपकडून काय घडलं आणि त्यांनी काय केलं हे सगळं सांगतो, असा हल्लाबोल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.


ते म्हणाले की, कसबा आणि चिंचवडच्या मतदारांचा मी आदर करतो मात्र या निवडणुकीसाठी पुण्यात भाजपच्या अनेक नेत्यांना तळ ठोकून बसावं लागलं. भाजप नेते गिरीष महाजन यांच्यासहित अनेक भाजप नेत्यांना तीन-चार दिवस पुण्यात तळ ठोकून बसावं लागलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील कसब्यात आणि चिंचवडमध्ये प्रचारासाठी उतरावं लागलं, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 


आम्ही खूप चांगला विरोध केला...


या पोटनिवडणुकीत आमच्य महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या पद्धतीने विरोध करण्याता प्रयत्न केला. ही पोटनिवडणूक भाजपला नीट हाताळता आली नाही. ही पोटनिवडणूक भावनेची होती मात्र तरीही ही पोटनिवडणूक भावनेची होऊ दिली नाही. कसब्यात विरोधी पक्षाने चांगली मेहनत केली. अनेक नेते मंडळी ठाण मांडून बसले होते. मोक्का लागलेल्या लोकांना प्रचारात सामील करण्यात आलं होतं, असाही आरोप त्यांनी केला आहे.


व्हायरल एक्झिट पोल कुणाच्या बाजूने?


जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी दोन एक्झिट पोल व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप या विजयी होतील असं म्हटलं आहे. स्ट्रेलिमा या संस्थेने जाहीर हा एक्झिट पोल जाहीर केला आहे. या पोल नुसार कसब्यात भाजपला धक्का बसणार आहे तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. हा एक्झिट पोल सध्या व्हायरल होत आहे. 


2019 च्या तुलनेत मतदान कमी



कसबा मतदारसंघासाठी 2019 मध्ये 51.64 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 50.06 टक्के मतदान झालं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4,540 मतं कमी आहेत. त्यात लोकमान्य नगर आणि नवीपेठ परिसरात मागील वर्षीपेक्षा कमी मतदान झालं आहे. ही सगळी आकडेवारी पाहता कसब्यात नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.