ST Bus News : एसटी महामंडळाच्या  (ST bus News) बसमध्ये महिलांना हाफ तिकीटांवर प्रवास करता येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र तरीही कंडक्टर महिलांना फुल तिकीट देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंडक्टरला 50 टक्के सवलतीने तिकीट महिला प्रवाशांना मागावी लागत आहे. हा सगळा प्रकार एका तरुणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  मी महिला आहे मला हाफ तिकीट द्या, हे सांगूनचं हाफ तिकीट मिळणार आहे का? असा सवाल या तरुणीने सरकारला विचारला आहे.


महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार अशी घोषणा सरकारकडून महिन्याभरापूर्वी करण्यात आली. त्यानुसार महिलांना प्रवासासाठी तिकीटाच्या 50 टक्केच पैसे मोजावे लागत आहे. मात्र कंडक्टरकडून महिलांना फुल तिकीट देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेसंदर्भात योग्य माहिती नाही त्या महिलांनी उघड फसवणूक होत असल्याचं चित्र आहे. पुण्यात नोकरी करणाऱ्या मयुरी देशमुख नावाच्या तरुणीने तिच्या सोशल मीडियावर हा सगळा प्रकार शेअर केला आहे. या तरुणीने तिकीट मागितली असता कंडक्टरने तिला फुल तिकीट दिलं होतं. त्यानंतर तिने कंडक्टरला जाब विचारला असता कंडक्टरने "तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला हाफ तिकीट हवं आहे, हे तुम्ही सांगितलं नाही, अशा शब्दात उत्तर दिल्याचा दावा तरुणीने केला आहे. 


सोशल मीडियावर तरुणीने शेअर केली घटना...

आज मी सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर  एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत होते. बसने प्रवास करत असताना, हाफ तिकीट मिळेल म्हणून थोडं आनंदात होते.. मात्र, कंडक्टरने जेव्हा तिकीट दिलं तेव्हा पाहिलं तर त्यांनी फुल तिकीट दिलं होत...फुल तिकीट का दिलं? याच उत्तर मागायला गेले, तेव्हा ते म्हणाले, "तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला हाफ तिकीट हवं आहे, हे तुम्ही सांगितलं नाही." म्हणजे मी महिला आहे मला हाफ तिकीट द्या, हे सांगूनचं हाफ तिकीट मिळणार आहे का? मला सरकारच्या या योजनेबद्दल माहित होत म्हणून मी कंडक्टरला बोलू शकले... मी बोलल्यावर त्यांनी मला हाफ तिकीट दिलं..मात्र, ज्या महिला अशिक्षित आहे, ज्यांना या योजनेबद्दल माहित नाही..त्यांनी आता काय करावं? कारण कंडक्टरच्या मते, तुम्ही जेव्हा सांगाल, हाफ तिकीट हवं आहे, तेव्हाच तुम्हाला हाफ तिकीट मिळेल.. आता महिलांनी काय करावं?, असा सवाल तिने सोशल मीडियावरुन सरकारला विचारला आहे.