Girish bapat : खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं बघायला मिळत आहे. सध्या भाजपकडून पाच नावांची चर्चा आहे. त्यात भाजप आता बापटांच्या घरात उमेदवारी देणार का? उमेदवारी दिली तर बापटांचा वारस कोण?, अशा चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागल्या आहे. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी भाजप सावध खेळी खेळणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांना भाजपने पोटनिवडणुकीवेळी उमेदवारी नाकारली होती. त्यावरुन राजकारण पेटलं होतं. अनेकांनी टीका केली होती. टिळक कुटुंबियांंनीदेखील नाराजी खुलेपणानं बोलून दाखवली होती. त्यांना उमेदवारी नाकारुन भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. सगळी फौज कामाला लावली होती. मात्र तरीही कसब्यात भाजपचा पराभव झाला. कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाली असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी म्हटले होते. म्हणजेच कसबाच्या पराभवातून भाजप धडा घेणार का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. 


गिरीश बापट यांचा वारस कोण?
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांची नावं टिळक कुटुंबीय म्हणून उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र आता गिरीश बापट यांच्या निधनानंतर बापट कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार याचा चर्चा सध्या रंगल्या आहे. गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, सून स्वरदा बापट, मुलगा गौरव बापट यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मुलगा गौरव राजकारणात फारसा सक्रिय नाही. त्यामुळे पत्नी किंवा सून या दोघींपैकी एक उमेदवार असू शकतो. सुनेला राजकारणाचा अनुभवदेखील आहे.


गिरीश बापट यांचा मुलगा गौरव यांना राजकारणात फारसा रस नाही. मात्र बापट यांची सून स्वरदा यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्या लग्नाच्या आधी सांगली मनपाच्या नगरसेविका होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील काम त्यांनी पाहीले आहे. गिरीश बापट यांच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून त्या पुणे शहरातील राजकारणात सक्रिय आहेत. 


ही पाच नावं भाजपकडून चर्चेत..
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत.