भिगवण, पुणे : दोन एसटी चालकांनी लावलेल्या बसच्या (ST Bus Acciedent) शर्यतीत एका निरपराध व्यक्तीचा बळी गेला असल्याची चर्चा सध्या पुण्यातील भिगवणमध्ये सुरू आहे. तर, पोलिसांनी मात्र, ती घटना अपघात असल्याचे म्हटले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) हा अपघात घडला.
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या बस पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून नागरिकाला जीव गमवावा लागला असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणं आहे. तर, भिगवण पोलिसांनी हा अपघात असल्याचे सांगितले आहे. या अपघात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. तर, दोन ते तीन दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली.
गंगाराम सोमा पवार ( वय 62 )असं मृत व्यक्तीचे नाव असून संदीप विठ्ठल डोंबाळे आणि मनोहर विठ्ठल बंडगर अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावचे रहिवासी आहेत. भिगवण पोलीस ठाण्यात बस चालक अशोक पांडुरंग साळुंखे याच्या विरोधात 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाराम पवार हे आपला नादुरुस्त मोबाईल दुरुस्त करण्यासाठी भिगवण येथील नवी पेठमध्ये पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात, हयगयीने आणि बेदरकारपणे रहदारीचे नियमांची पायमल्ली करत येणाऱ्या एसटीने त्यांना धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
धारशिव जिल्ह्यातील कळंब एसटी डेपोची बस पुण्यावरुन कळंबकडे निघाली होती. दरम्यान भिगवण बस स्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हरने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 279, 337338,304 (अ), 427 मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, बस स्थानकासाठी असणाऱ्या सर्विस रस्त्याने येणाऱ्या दोन बस चालकामध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि जखमी संदिप विठ्ठल डोंबाळे यांनी सांगितले आहे. परंतु पोलिसांनी प्रथमदर्शनी तरी बसच्या चालकांनी शर्यत लावली नव्हती, असं दिसून आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमका दावा कोणाचा खरा, या प्रकरणात काही लपवाछपवी होत आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबतचा अधिक तपास भिगवण पोलीस करीत आहेत.
ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा नोंद करण्याची मागणी
बारामती भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी येथे झाला असून जोगेश नाथसाहेब पाचांगने अस भिगवण येथील मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर इसमाचा मृत्यू हा अर्धवट झालेल्या रस्त्यामुळे झाला असल्याचा नागरीकांचा आरोप आहे.. भिगवण बारामती रस्त्याचे काम सुरू आहे. पण ठेकेदाराने या रस्त्यावर कोणताही सुरक्षितता उपाय योजना न करताच अर्धा रस्ता सुरू केला असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप आहे..तसेच पर्याय रस्ता न बनवता संपूर्ण रस्ता खोदून नागरिकांची अडचण केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. संबंधित ठेकेदार आणि निरीक्षक अधिकारी PWD उपअभियंता यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. जर ( IPC 304 D part 2) गुन्हा दाखल नाही झाल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे तुषार झेंडे यांनी म्हटलं आहे.