पुणे: पुण्यातून (Pune) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. यासंबधिची व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात, रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.परंतु दुसऱ्या दिवशी गायकवाड त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेले असता ससून रूग्णालयातील तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. 


या घटनांवरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) सुरू आहे अशी माहिती गायकवाड यांना मिळाली. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश गायकवाड यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. त्यानुसार काल(सोमवारी) पहाटे दीड वाजता रितेश गायकवाड रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असल्याचे समजून एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर 'इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितले. 


त्यांनी 'नेमके कुठे सोडू? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत' असे विचारल्यावर डॉक्टरांनी तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असे डॉक्टरानी सांगितले. काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात बसवला. त्या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.