पिंपरी चिंचवड : लग्नासाठी मुलगी मिळत नसलेल्या व्यक्तींना जाळ्यात खेचून चुना लावणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे अटकेतील अकरा आरोपींमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे.


मावळ तालुक्यात असाच एक विवाह सोहळा पार पडला. यावेळी मुंबईचा डबेवाला या टोळीच्या जाळ्यात फसला होता. मध्यस्थीला अडीच लाख ही देऊन दिले. मूळचा मावळ तालुक्यातील या डबेवाल्याचा विवाह 21 जानेवारीला देवाच्या आळंदीत पार पडला. पण अवघ्या काही दिवसांतच नवरी मुलीवर त्याला संशय आला, म्हणून त्याने तिचा मोबाईल तपासला. यात काही संभाषण आणि संशयित डेटा त्याच्या हाती लागला. यातून त्याची पत्नी ही दोन मुलांची आई असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तर फोनमधील संभाषणात ती नवऱ्या मुलाच्या घरातील दागिने आणि रोकड घेऊन येणार असल्याचे म्हणते, तसेच ठरल्याप्रमाणे माझी रक्कम मला मिळायला हवी. अशा आशयाची क्लिप ऐकताच त्याची फसवणूक झाल्याचं त्याला समजलं.


मग याबाबत स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून अकरा जणांना अटक केली. त्यांनी आतापर्यंत सहा जणांना फसवल्याचं कबूल केलं आहे.