पुणे : पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली होती. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावं असं म्हटलंय. त्यामुळं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.


23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम असल्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केलीय.


पूजाने ज्या वानवडी भागात आत्महत्या केली त्या भागातील स्थानिक भाजप नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय. सोशल मीडियावर राज्य सरकारमधील एका मंत्र्याचं नाव या प्रकरणात घेतलं जात असल्यानं पोलिसांनी या प्रकरणाचा सोखमोक्ष लावण्याची गरज असल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय.


पूजा चव्हाण आणि तिच्या मित्राचे जसे राज्य सरकार मधील मंत्र्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आहेत तसेच भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबत देखील फोटो आहेत. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलंय. परंतु, पूजाच्या आई-वडिलांनी अजूनपर्यंत गप्प राहणंच पसंत केलय. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्ह दिसू लागल्यानं पुणे पोलिसांनी स्वतः या प्रकणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे.