PMPML Strike : पुणे महानगर परिवहन (PMPML Strike ) महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या चार कंत्राटदारांचा दोन दिवसीय संप सोमवारी रात्री 66 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने मागे घेतला आहे. या संपामुळे प्रवासी सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सुमारे आठ लाख प्रवाशांवर परिणाम झाला होता. उर्वरित रक्कमही लवकरच दिली जाणार असून, पीएमपीएमएलची बससेवा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. संप संपल्याने गैरसोय झालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बिल न भरल्याने चार कंत्राटदार संपावर गेले होते. सोमवारी 66 कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे,”पीएमपीएमएल, पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितलं आहे.
चार महिन्यांपासून 99 कोटी रुपयांच्या थकीत बिलांमुळे रविवारी दुपारी कंत्राटदार संपावर गेले होते. त्यामुळे पीएमपीएमएलच्या 907 बसेसची सेवा विस्कळीत झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सोमवारी पीएमपीएमएल प्रशासनाला 90 कोटी रुपये दिले, त्यापैकी 54 कोटी रुपये पुणे महापालिकेकडून (पीएमसी) आणि 36 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून (पीसीएमसी) आले. या रकमेपैकी 66 कोटी रुपये कंत्राटदारांना देण्यात आले तर 24 कोटी रुपये एमएनजीएलला देण्यात येणार आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांची बिले सोमवारी मंजूर झाली. ऑलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी आणि हंसा हे चार कंत्राटदार संपात सहभागी झाले होते.
राजकीय लोकांनी घेतली होती बकोरियांची भेट
सोमवारी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि संतोष नांगरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीएमएलचे सीएमडी बकोरिया यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी निवेदनही दिलं होतं. त्यानंतर बकोरिया यांनी थकबाकी देऊन बससेवा पुर्ववत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुण्यात बससेवा सुरु करण्यात आली आहे. होळीच्या दिवशी बससेवा सुरु केल्याने पुणेकरांचा नाहक त्रास कमी झाला आहे.
पुणेकरांच्या प्रश्नासाठी भाजप-कॉंग्रेस एकत्र
बससेवा बंद किंवा संपामुळे भाजप कॉंग्रेस पहिल्यांदाच एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही पक्षाचे नेते म्हणजेच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर हे एकाच वेळी पीएमपीएमएलच्या कार्यलयात आल्याचं दिसलं. त्यामुळे पुणेकरांच्या प्रश्नांना दोन्ही पक्षाकडून पहिलं प्राधान्य दिल्याचं या निमित्ताने बघायला मिळालं आणि पुणेकरांच्या प्रश्नांसाठी एकत्र आल्याचंही दिसलं.