पुणे : माऊंट एव्हरेस्ट सर केल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप असलेल्या दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या निलंबित पोलीस दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली छळ केल्याने आपला गर्भपात झाला, असा आरोप तारकेश्वरी राठोड यांनी केला आहे.
पुणे पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्याने गेल्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला होता. मात्र काही दिवसांनंतर हा दावा खोटा असल्याचं समोर आल्यानंतर राठोड दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याचा पुरावा म्हणून काही फोटो आणि नेपाळ सरकारचं प्रमाणपत्र सादर केलं होत. मात्र त्यांचा हा दावा खोटा असल्याचा आणि पुरावे बनावट असल्याचा आरोप काही जेष्ठ गिर्यारोकांनी केल्यावर वाद निर्माण झाला.
त्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राठोड दांम्पत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर दोघांनाही पोलिस खात्यातून निलंबीत करण्यात आलं होतं.
आता पुढची चौकशी पूर्ण होत आल्याने दोघांना सेवेतून बडतर्फ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.