पिंपरी : मालगाडीवरून रेल्वे रूळ ओलांडण्याचा वडिलांनी दिलेला सल्ला मुलाच्या जीवावर बेतल्याची वसईतील घटना ताजी असतानाच, पिंपरी चिंचवड मध्ये ही मालगाडीवरून शॉर्ट कट मारण्याचा प्रयत्न अहमद खत्री या तरुणाच्या जीवावर बेतला आहे. मूळचा देहूतील अहमद पाणी आणण्यासाठी रेल्वे स्थानकावर आला मात्र मालगाडीवरून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात त्याला हाय टेन्शन वायरचा शॉक लागला आणि तो प्लॅटफॉर्म वर कोसळला.

नेहमीप्रमाणे गुरुवारी परिसरातील वीज पुरवठा खंडित असल्यानं पाणी ही आले नाही. त्यामुळंच रात्री दहा वाजता अहमद रेल्वे स्थानकावर पाणी आणायला गेला होता. मात्र शॉर्ट कट मारण्याच्या नादात त्याला बसलेल्या विजेच्या धक्क्यात तो 80 टक्के भाजला. सध्या त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.

पिंपरी चिंचवड ते लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गावर शॉर्ट कट मारणं आणि धावत्या रेल्वेतून चढणं-उतरणं अश्या घटना गेल्या वर्षात अनेकदा घडल्यात.

6 जून 2016 - सचिन डुगलज, धावत्या रेल्वेत स्टंट बाजी करताना देहू परिसरात खाली कोसळला. यात तो दोन्ही हात-पाय गमावून बसला.

17 जून 2016 - लोणावळा स्थानकावर धावत्या रेल्वेत चढताना एक तरुण रेल्वेखाली आला, प्रसंगावधान राखत दोन जिगरबाज पोलिसांनी त्याला जीवदान दिलं.

9 सप्टेंबर 2016 - आदित्य शिरसाठ, हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना आकुर्डी जवळ रेल्वेने उडवले. यात त्याचा मृत्यू झाला.

25 सप्टेंबर 2016 - लोणावळा स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरताना एक तरुणीचा पाय घसरला आणि ती रेल्वे खाली आली, जिवाची पर्वा न करता तीन पोलिसांनी तिला वाचवले.

एका पाठोपाठ एक अशा घटना घडत असताना प्रवासी आणि लोहमार्गालगत राहणारे नागरिक मात्र यातून काही धडा घेताना दिसत नाहीत.