पुणे: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही तासांमध्ये खडकवासला धरण साखळी परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे. परिणामी खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. परिणामी पुण्यातील डेक्कन परिसरातील पुलाची वाडी नदीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पुण्यातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे.


दरम्यान पुण्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे, काल(शनिवारी) तो 35,310 क्युसेक इतका होता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर डेक्कन परिसरातील पुलाची वाडी नदीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी भरलं आहे.यासह डेक्कन परिसरातील नदीपात्र देखील पूर्णपणे पाण्याखाली गेला असून भिडे पूल आणि नदीपात्रातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.आज देखील पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


भिडे पूल पाण्याखाली


पुण्यामध्येही कालपासून पाऊस सुरू असून शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील रिमझिम पाऊस सुरू आहे. गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर डेक्कन परिसरात असलेला झेड ब्रिज पाण्याखाली गेला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तास पुणे शहर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. 


पुण्याला रेड अलर्ट


येत्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.


राज्यात कोणत्या विभागाला कोणता इशारा 


रेड अलर्ट - पुणे, सातारा - रविवार (25 ऑगस्ट) अतिवृष्टी 
ऑरेंज अलर्ट - पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा - (25, 25, 27 ऑगस्ट) मुसळधार 
यलो अलर्ट - पालघर (26,27), ठाणे, सिंधुदूर्ग (27) रायगड, रत्नागिरी (28) धुळे (25,26) नगर, नंदुरबार (25), जळगाव (26), पुणे आणि सातारा (26,27), अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (25 ते 28)