पुणे: गेल्या काही तासांपासून धुवांधार कोसळत असलेल्या पुण्यातील पावसाचा जोर आगामी तासांमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही तासांमध्ये खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. परिणामी खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग २३ १२२ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, तरीही भिडे पूलाजवळ पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 


या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून भिडे पूलाजवळ जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढल्यास खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग वाढवला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास पुणे शहर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. 


राज्यात पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाची शक्यता


येत्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.


गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचे विसर्ग सुरु


गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्री पावसाने काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊस बरसला आहे. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या  धरणातील पाणीसाठ्यात  झाली आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणाचे 6 गेट 1 फुट  उंचीने  सुरू करण्यात आले असून त्या मधुन 4766 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आहे .


याशिवाय, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. संततधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. जिल्ह्यात अजुन दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.


आणखी वाचा


राज्यात पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाचे! आज 'या' जिल्ह्याला 'रेड अलर्ट', कोणत्या भागात कोणता अलर्ट? जाणून घ्या