पुणे :  पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेय. हवामान खात्याने चार दिवस पुण्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. विजांच्या कडाक्यासह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. अचनाक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीेचे वारे सुरु आहे. येत्या 13 मेला मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असल्याने पुण्यात विविध पक्षाकडून सभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक आलेल्या पावसाने प्रचार सभांवर पाणी फेरलं आहे. 


सोमवारीदेखील दुपारी तीननंतर शहराच्या काही भागांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने या भागात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.  कात्रज, एनडीए, धायरी, वारजे, पाषाण या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडतोय. गेल्या 10 दिवसांपासून पुण्याचं कमाल तापमान 38 ते 40° सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. 


अवकाळी पावसात कार वर झाड कोसळलं, महेश लांडगे मदतीला धावले.


पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच विमाननगर परिसरात एक झाड थेट वाहनावर कोसळलं. त्या वाहनामागून भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे येत होते. त्यांच्या समोरच्या वाहनावर झाड कोसळल्याचं पाहून लांडगे त्यांच्या मदतीला धावले. लांडगे सह उपस्थितांनी वाहनातील सर्वांना बाहेर घेतलं. सुदैव इतकंच की झाड छोटं होतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाहनातील कोणाला ही मोठी इजा झाली नाही.


 प्रचारसभांवर पाणी फेरलं?


आज पुण्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो होता मात्र अजित पवार पावसामुळे रोड शोला पोहचू शकले नाहीत. मावळमध्येदेखील वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे आज पुण्यात राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी 8 वाजता ही सभा होणार आहे मात्र सभेसाठी संपूर्ण तयारीदेखील झाली आहे. मात्र विजांच्या कडाक्यासह पडत असलेल्या पावसाचा फटका राज ठाकरेंच्या सभेवर होण्याची शक्यता आहे.