मावळ, पुणे : मावळ लोकसभेत अजित पावरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत (Maval Loksabha Election) महायुतीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मतदान काही तासांवर येऊन ठेपलं असताना भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून आला. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल चालवणाऱ्यांची निकालानंतर पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला. तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी सुरुंग विरोधकांना लावायचा आहे, महायुतीला नाही ना? असा प्रतिप्रश्न शेळकेंना विचारला. तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि उमेदवार श्रीरंग बारणेंनी महायुतीनं एकदिलाने काम केलं तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, असं म्हणत भाजप - राष्ट्रवादीसह घटक पक्षांना साकडं घातलं. अजित पवारांनी हाच धागा धरला आणि गडबड करणाऱ्यांची खैर नाही, असा सज्जड दम खालच्या कार्यकर्त्यांना भरावा लागला. अजित पवारांच्या सभेत महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली.


 पिंपरीत आमदाराच्या मुलीच्या स्वागत समारंभात माझं लक्ष नसताना विरोधी आघाडीच्या उमेदवाराने पाय पकडून,  माझे आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची 'बनवाबनवी' केली. अशी बनवाबनवी आणि नौटंकी चालणार नाही, असा थेट इशारा दिला अजित पवार यांनी दिला. मावळात धनुष्यबाणाचेच काम करायचे ही आपली स्पष्ट भूमिका असताना कोणी गडबड करताना दिसले, तर त्या कार्यकर्त्याचे कामच करून टाकीन, या शब्दांत अजितदादांनी सज्जड दमही भरला.


महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव न घेता पवार यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाहाप्रित्यर्थ  स्वागत समारंभात उपस्थित राहण्यासाठी गेलो असता, माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते. पण तो टपूनच बसला होता. पठ्ठ्याने माझे पाय पकडून फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत जणू अजितदादांचा आपल्याला आशीर्वाद आहे, असा बनाव त्याने केला. ही असली बनवाबनवी, नौटंकी चालणार नाही, या शब्दात त्यांनी खडसावले.


अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक देशाची आहे. नात्यागोत्याची नाही. जय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळवायचा असेल तर मावळातून बारणे पुन्हा खासदार होणे आवश्यक आहे. 'एक घाव, दोन तुकडे' हा माझा स्वभाव आहे. मावळात फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालवायचे, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तालुक्यातील वरिष्ठ नेते काम करीत असले तरी खालच्या फळीतील काही कार्यकर्ते 'गडबड' करताना दिसत आहेत. त्यांनी वेळीच सुधारणा करावी, अन्यथा त्यांचे कामच करून टाकीन. 


 इतर महत्वाची बातमी-


Dr. Narendra Dabholkar Case Verdict : मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकरला जन्मठेप, तिघे निर्दोष