पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) मोठी माहिती समोर आली आहे. बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. या दोन सदस्यांनी अल्पवयीन आरोपीला जामीन दिला होता, त्यामध्ये काही त्रुटी आणि अनियमितता असल्याची तक्रार महिला आणि बालविकास खात्याने केली आहे. 


कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली आहे.


जामीन प्रक्रियेमध्ये अनियमितता 


या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत विविध त्रुटी आणि अनियमितता आढळून आल्या असून त्या बाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.


अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर महिला आणि बाल विकास आयुक्तांनी या सदस्यांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच त्या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर या सदस्यांनी दिलेल्या खुलाशाने समितीची समाधान झालेले नसून या प्रकरणात अनियमितता आढळून आले असे अधोरेखित करणारा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे.  


दरम्यान, उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षण गृहातून मुक्त करण्याचे आदेश दिले असले तरीसुद्धा पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे. 


पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षाच्या मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकल्या गेल्या. 


त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता. 


ही बातमी वाचा: