Pune Porsche Car Accident पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal Arrest) यांना क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आता अल्पवयीन मुलगा आणि आई शिवानी अग्रवाल यांची समोरासमोर बसवून एकत्रित चौकशी करणार आहेत.
अल्पवयीन मुलाच्याऐवजी मुलाच्या आईने रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आई शिवानी अग्रवाल यांची रक्त चाचणी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे बदलण्यात आलेले रक्ताचे नमुने नेमके कोणाचे होते, हे स्पष्ट होणार आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल.
बाप अन् लेकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी, व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशाल अग्रवालवर विविध गुन्हे
पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अग्रवाल पिता-पुत्रावर आहे.