Pune Porsche Car Accident : पुण्यातील ब्रम्हा ग्रुपचा धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारखाली दोघा चिरडून मारल्यानंतर पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील अनधिकृत पबवर कारवाई सुरू असतानाच आज पब संस्कृती विरोधात सातत्याने आवाज उठवणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आज पुण्यातील एक्साईज कार्यालयामध्ये पोहोचल्या. 


सुषमा अंधारेंनी हप्ता यादीच वाचून दाखवली


यावेळी सुषमा अंधारे यांनी अबकारी विभागाची अक्षरशः लाज काढत पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली. काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचे सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले. यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी यांनी कार्यालयामध्ये पोहोचत पब संस्कृतीवर एक प्रकारे हातोडा टाकताना कारवाई कधी करणार? अशी विचारणा करत विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली. 



दरम्यान सुषमा अंधारे यांनी यादी वाचून  दाखवल्यानंतर एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी होणाऱ्या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण  देण्याचा प्रयत्न केला. आरोपांमध्ये तथ्य असल्यास चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी हे आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट सांगितले. 


अधिकाऱ्यांनी यावेळी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यामध्ये आम्ही कारवाईचा वेग दुप्पट केल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पुण्यामध्ये जवळपास आठ हजार गुन्हे दाखल करण्यात आले असून एक्साईज विभागातील पोलिस कर्मचाऱ्यापासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत पुणेकरांसाठी झगडत असल्याचा दावा केला. तसेच हे रेकॉर्ड काढून तुम्ही चेक करा असेही त्यांनी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांना सांगितले. 


पब संस्कृतीला तुम्ही परवानगी कोणत्या पद्धतीने दिल्या? मनपाच्या परवानगीशिवाय पत्रा टाकता येत नसताना तुम्ही परवानग्या दिल्या? याची माहिती तुम्ही आजच आम्हाला द्या, त्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे आव्हान रवींद्र धंगेकर यांनी दिले. सुषमा अंधारे त्यांच्या कामासाठी गेल्या तरी मी 24 तास इथंच असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या