Pune Porsche Car Accident : पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणाकडे (Pune Porsche Car Accident Updates) संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. याप्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहे. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशातच याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपीचा वडील बिल्डर विशाल अग्रवालनंदेखील त्याच्या जबाबत असाच दावा केल्याची माहिती मिळत आहे.
एका इंग्रजी वृत्तसमुहानं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अपघाताच्या वेळी मी गाडी चालवत नव्हतो, तर आमचा चालक गाडी चालवत होता, असा दावा पुणे पोर्शे कार अपघातातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि गाडीतील त्यांच्या दोन मित्रांनी जबाबात केल्याची माहिती आहे. आरोपीचा बाप बिल्डर विशाल अग्रवाल यानंही अपघाताच्या वेळी आमचा फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत होता, असा दावा केला आहे. दोघांच्या वक्तव्यानंतर बापलेकाची जोडगोळी पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मुलाला कार चालवू द्यायला, विशाल अग्रवालनंच सांगितलं, ड्रायव्हरचा दावा
धनिकपुत्र आणि पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपी कोझी पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेलेला. पार्टीनंतर पबमधून बाहेर आल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नसल्याचं पाहून ड्रायव्हरनं विशाल अग्रवालला फोन केला. त्याला गाडी चालवू देत, असं विशाल अग्रवालनं स्वतः सांगितल्याचा दावा ड्रायव्हरनं केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात ड्रायव्हरनं ही माहिती दिल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर जंक्शन येथे रविवारी पहाटे 3.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं चालवलेल्या पोर्शे कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या इंजिनिअर तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला.