पुणे : रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या (Pune Accident News)  आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये (Blood Report) फेरफार प्रकरणात दोन डॉक्टर अडकल्यानं ससून हॉस्पिलटची पुरती नाचक्की झालीय. या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एक विशेष तपास पथक नियुक्त केलंय. जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे त्याच्या अध्यक्षपदी आहेत. पण डॉ. पल्लवी सापळे (Pallavi Sapele)  यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यानं वाद निर्माण झालाय. आता त्यात आणखी भर पडली असून चौकशीच्या नावाखाली  बिर्याणीवर ताव मारणारी  समिती अशी नवी ओळख मिळाली आहे. 


रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्याच्या प्रयत्नात ससूनची बदनामी झाली आहे. ससूनमधील  सावळ्या कारभाराचा  खुलासा करण्यासाठी  चौकशी करण्यासाठी  आता एसआयटी समिती गठीत केली. मात्र पुण्यात आलेली ही समिती पहिल्याच दिवशी चर्चेत आली ती त्यांच्या बिर्याणीच्या मेजवानीमुळे... चौकशीच्या नावाखाली पुण्यात येऊन बिर्याणीवर ताव मारणारी समिती बरखास्त करा अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.


पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधून मागवली बिर्याणी


रुग्णालया प्रशासनाने चौकशीसाठी आलेल्या समितीच्या खातीरदारीमध्ये कोणतीची कमी ठेवली नाही.समितीतील सदस्यांसाठी पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आली. बिर्याणीवर आक्षेप नाही मात्र अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या दालनात मेजवानी सुरू असताना चौकशीसाठी बोलवलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणास मनाई केली समितीचे सदस्य बिर्याणीवर ताव मारत असताना बाहेर कर्मचारी मात्र उपाशीपोटी ताटकळत उभे असल्याची माहिती समोर आली आहे. 


समितीचा बिर्याणीवर ताव, कर्मचाऱ्यांना मात्र जेवणास मनाई 


मंगळवारी दुपारी ही समिती तपासासाठी पुण्यात पोहचली. धनिकपुत्राच्या लाडोबाने दोन जणांना चिरडल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप आहे. त्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रतापाने तर कहर केला. त्यात चौकशी  समितीकडून पारदर्शक कारभाराची सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. मात्र पहिल्याच दिवशी समितीच्य बिर्याणी पार्टीची चर्चा चांगलीच रंगली. अर्थात कोणी काय, कधी खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्यामुळे कोणीतरी ताटकळत, उपाशीपोटी उभे आहे, याचे भान समितीने ठेवणे अपेक्षीत आहे.


एसआयटी समिती वादाच्या भोवऱ्यात


एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्याऩ, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.  


हे ही वाचा :


Pallavi Sapele : तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशी कशी करणार? पल्लवी सापळे हसून म्हणाल्या, माझी नियुक्ती शासनाकडूनच, त्यांनाच विचारा!