पुणे : पुणे अपघातप्रकरणी (Pune Porsche Accident News)  मोठी अपडेट समोर आलीय. कल्याणीनगर अपघात (kalyani Nagar)  प्रकरणात फडणवीसांच्या आदेशानंतर  पुणे पोलिस सध्या अॅक्टिव्ह मोडवर आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. या प्रकरणात  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar)  गटाचे आमदार सुनील टिंगरेंचे (Sunil Tingre)  नाव समोर येत आहे.   या प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अग्रवाल कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात आहे आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  देखील  पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून कल्याणीनगर रॅश ड्रायविंग प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली आहे.तसेच कडक शब्दांत समज दिली आहे.


लवकरच मुख्यमंत्री पुण्याला जाण्याची शक्यता


कल्याणीनगर  अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत.  कितीही मोठा व्यक्ती असला कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला  तरी या दबावाला बळी न पडता तपास करा. राज्य सरकार पूर्णपणे पोलीसांसोबत असून पोलिसांकडून योग्य कारवाई झाली पाहिजे. कोणाचाही हस्तक्षेप या प्रकणात खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना आयुक्तांना केली आहे. तसेच जीव गेलेल्या दोन मुलांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच कोर्टात केस टिकेल अशा पद्धतीने तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री पुण्याला जाण्याची शक्यता आहे. 


दबावाला बळी न पडता योग्य तपास करा : मुख्यमंत्री


पोर्शे अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालने सुनील टिंगरे यांना फोन केलेला त्यानंतर पहाटेच टिंगरे हे पोलिस ठाण्यात गेले होते. तसेच आमदार सुनील टिंगरेंनी दबाव टाकल्याचा देखील  आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे ज्यांच्यावर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे, त्यांची नेमणूक करण्याची शिफारस ही टिंगरेंनीच केली होती, त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना यासंबंधी एक शिफारस पत्र दिलं होतं, ते देखील समोर आलं. त्यानंतर याप्रकरणात राजकीय दबाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करत  कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करा, सरकार तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.