पुणे : संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणात आरोप असणाऱ्या शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची संधी मिळणार आहे.
न्यायालयाने काय निर्णय दिला?
या कार अपघात प्रकरणात पोलिसांनी याआधी विशाल अग्रवाल यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (1 जून) पोलिसांनी याच प्रकरणात शिवानी अग्रवाल यांनाही अटक केलं. त्यांनीच ससून रुग्णालयात जाऊन स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले होते, असे चौकशीतून समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. आज या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आता या पाच दिवसांत पुणे पोलीस या प्रकरणाबाबत विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्याशी चौकशी करू शकतात. यातून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी मागितली सात दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर अग्रवाल यांच्या वकिलांनी तसेच पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांनी आपापली बाजू मांडली. अटक करण्यात आलेले आरोपी हे विधीसंघर्षग्रस्त बालकाचे पालक आहेत. त्या बालकाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात पालकांचा थेट समावेश आहे. शिवानी अग्रवाल यांना कोणीतरी ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. शिवानी यांना रक्ताचे नमुने देण्यास कोणीतरी सांगितले होते. ती व्यक्ती कोण आहे, याचा तपास करायचे आहे. सखोल चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती.
विशाल, शिवानी अग्रवाल यांची डीएनए चाचणी करायची आहे
न्यायालयात युक्तिवाद चालू असताना तपास अधिकाऱ्यानेदेखील न्यायालयाला अतिरिक्त माहिती दिली. रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करण्यासाठी विधीसंघर्षग्रस्त बालकाचे रक्त तपासण्याऐवजी त्याच्या आईचे रक्त तपासण्यात आले. या सगळ्या षडयंत्रामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोन्ही आरोपींचे डीएनए सॅम्पल घ्यायचे आहेत. 3 लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा तपास करायचा आहे. मूळ रक्ताचे नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचाही शोध घ्यायचा आहे. विशाल, शिवानी अग्रवाल यांच्या घराची झाडाझडती घ्यायची आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला दिली.
पुणे कार अपघात प्रकरण काय आहे?
पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी गाडी विधिसंघर्षग्रस्त बालक चालवत होता, असा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी! लोकसभेच्या निकालानंतर भाजप भाकरी फिरवणार? राष्ट्रीय स्तरावर मोठा निर्णय होण्याची शक्यता