मुुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. आता देशभरात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, या निकालाआधीच महाराष्ट्रातील उमेदवार माझाच विजय होणार असे ठणकावून सांगत आहेत. दुसरीकडे हाच उत्साह कार्यकर्त्यांमध्येही दिसून येतोय.कार्यकर्ते ठिकठिकाणी आपल्या नेत्याच्या विजयाचे बॅनर्स लावत आहेत. दरम्यान, बारामती (Baramati) मतदारसंघातही हेच चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या विजयाचे बॅनर लावले असून सध्या त्याची सगळीकडे चर्चा होत आहे.


बारामतीतील बॅनर्सची सगळीकडे चर्चा


लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तासच उरले असताना इंदापूरात मात्र पोस्टर वॉर पहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचे पहायला मिळाले. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच लावलेल्या या बॅनर्सची सध्या कगळीकडे चर्चा होत आहे. 


एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात? 


दरम्यान, एक जूनचे मतदान संपल्यानंतर संध्याकाळी वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले. या आकड्यांच्या मदतीने देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीत एनडीएला (NDA) 353-383 तर इंडिया आघाडीला (INDIA Alliance) 152-182 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


महायुती, महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?


दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र यावेळी महायुतीच्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26  जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये महायुतीतील भाजपला 17, एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेला 5, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येकाँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.


हेही वाचा :


ABP Cvoter Exit Poll 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज


Lok Sabha Election Exit Poll 2024 : भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरणार? तीन एक्झिट पोल NDAच्या बाजूने