पुणे : दारुच्या नशेत बेदरकार कार चालवून, (Kalyani Nagar accident) दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवाल (Vedant Agarwal Pune) याच्याबाबत नवनवी माहिती समोर येत आहे. वेदांतला आधी अटक झालेल्या दिवशीच जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेच, शिवाय न्यायालयाने त्याला घातलेल्या अटीही त्यापेक्षा आश्चर्यकारक आहेत. दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांतला न्यायालयाने अल्पवयीन आरोपी असल्याने जामीन मंजूर केला, त्याला ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करायला सांगितलं आणि अपघातावर निबंध लिहायला सांगितलं आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना, दुसरीकडे आरोपीला वाचवण्यासाठी खुद्द आमदाराकडून प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.  पुण्यातील नागरिकांनीही तसे आरोप केले आहेत. यामध्ये काही प्रत्यक्षदर्शी आहेत. 


आमदाराकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न


पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा विशालने 19 मे रोजी पहाटे  आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात हा थरारक अपघात घडला. वेदांतच्या भरधाव पोर्शे कारने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) या तरुण तरुणीला चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर जमावाने आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र यावेळी पुण्यातील आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन बिल्डरपुत्राला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. 


पुणे मिरर या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, पुण्यातील एका आमदाराने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पुणे मिररच्या वृत्तानुसार, अपघातानंतर संंबंधित आमदाराने येरवडा पोलिस ठाण्यात हस्तक्षेप केला. या अपघातासाठी ड्रायव्हर जबाबदार आहे असं भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र प्रत्यक्षदर्शींनी आमदारांचा हा दावा खोडून काढत, वेदांत अगरवालच गाडी भरधाव चालवत होता हे ठणकावून सांगितलं. ज्याला आमदार महोदय ड्रायव्हर म्हणून सांगतं होते, ती व्यक्ती दुसऱ्या बाजूला बसली होती, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे हे आमदारच आता आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. 


देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश


दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून 2 जणांचे जीव घेतल्याच्या घटनेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन याबाबत सूचना केल्या.  या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.  या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश फडणवीसांनी दिले. 


दोन पब चालकांवर गुन्हा


दरम्यान, पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाचा वडील विशाल अगरवाल आणि त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्शे कारने अपघात करुन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा अल्पवयीन असूनदेखील त्याला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल त्याचे वडील विशाल अगरवाल, अल्पवयीन असून देखील त्याला दारु देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?


पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, या घटनेची माहिती दिली. अमितेश कुमार म्हणाले, "आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क अर्थात एक्साईज डिपार्टसोबत काम करण्यात येईल. कोणालाही वाचवण्यात येणार नाही.  विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आलाय.  या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातून समजेल.  या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल.  हा मुलगा खरंच अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येतोय.  हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे"


नेमका अपघात कसा घडला?


वेदांत अगरवाल हा रविवारी पहाटे त्याच्या मित्रांसोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते.  कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या,दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर  संतप्त जमावाने वाहनचलाक वेदांतला पकडून चोप दिला. 


वेदांत हा  ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा आहे.  दरम्यान, आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतने भरधाव वेगाने कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला. त्यामुळे, अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.  


VIDEO : 



 


संबंधित बातम्या 


Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, आरोपीने दारु पिऊन गाडी चालवल्याचं स्पष्ट; जामिनाविरोधात पुणे पोलीस सत्र न्यायालयात     


Pune Crime: पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या धनिकपुत्राला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपींसाठी पिझ्झा बर्गरची व्यवस्था