पुणे : बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार (Pune Porsche Car Accident) चालवून दोघांना चिरडणारा पुण्यातील अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवालला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे. दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक असल्यानेही भूवया उंचावल्या आहेत. सर्वच स्तरातून सडकून टीकेचा मारा सुरु झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील सादर केला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली.


पुणे अपघातात आरोपीने नशेतच पोर्शे कार चालवल्याचं स्पष्ट!


पुण्यात झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आता पोलिसांनी सुद्धा वेदांत अगरवालने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवल्याचे स्पष्ट असल्याचे सांगितले.  अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी अबकारी विभागासासोबत काम करण्यात येईल. 


कोझी आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार


अमितेश कुमार यांनी सांगितले की, कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का आहे का? यातून समजेल. ते म्हणाले की, या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे.


बिल्डराने आपल्या पोरासाठी मध्यरात्रीच 'बळाचा' वापर करत आपला मुलगा कार चालवत नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ड्रायव्हरला त्याठिकाणी उभा केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या धुलाईने आणि दिलेल्या माहितीने भांडाफोड झाला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या